पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहरातील चाकणमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या करून घटनेच्या व्हिडिओची इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या हत्येचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमक काय घडल?
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, चाकणमध्ये तीन अल्पवयीन मुले मद्यपान करायला बसली होती. त्यापैकी, दोघेजण हे सराईत गुन्हेगार होते. त्यावेळी तिघांमध्ये वाद झाला. आरोपीसोबत असलेल्या मुलाला खून झालेल्या मुलाने कानशिलात लगावली होते. त्यावेळी सतरा वर्षीय अल्पवयीन सराईत गुन्हेगाराने त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली.
त्याच्याच मित्राने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. मीच त्याची हत्या केली असं म्हणत तो व्हिडिओ काढायला सांगत आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तात्काळ दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून हत्या झालेल्या अल्पवयीन मुलावर खून केल्याप्रकरणी तर हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलावर पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.