-संगीता कांबळे
पिंपरी : मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील रस्त्यांवर तब्बल 2003 खड्डे आढळून आले आहेत. त्यापैकी महापालिका स्थापत्य विभागाकडून 1580 खड्डे बुजवले असल्याचा दावा केला आहे. तर अजूनही 423 खड्डे शिल्लक राहिले आहेत. तर, पावसामुळे डांबरीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे, मुरुम, खडी आणि सिमेंट-कॉंक्रिटने बुजवले जातात. पावसाळा संपल्यानंतर सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहे. उर्वरित खड्डे देखील लवकरच बुजवले जातील, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
शहरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. तर, मागील आठवड्यात जोरदार पावसामुळे पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. तर, पावसामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चिखली, आकुर्डी परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. परिणामी महापालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. शहरासह अनेक भागात पावसाच्या पाण्याने अनेक भागात खड्डे तयार झाले आहेत.
अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. खड्ड्यात जाताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच दुचाकी घसरून अपघात होत आहेत. महापालिका स्थापत्य विभागाने पावसाळ्यापूर्वी शहर खड्डेमुक्त करणे गरजेचे होते. मात्र, महापालिका प्रशासन त्यात अपयशी ठरले असून प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
असे बुजविले खड्डे
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 2003 खड्डे आढळले होते. त्यांपैकी 1639 खड्डे 13 जुलैपर्यंत आढळून आले होते. त्यानंतर 22 जुलै अखेर 364 खड्डे आढळून आले आहेत. यांपैकी डांबर आणि कोल्ड मिक्सने 1011, खडीने 356, पेव्हिंग ब्लॉकने 66, सिमेंट कॉंक्रिटने 147 असे 1580 खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. शहरातील केवळ 423 खड्डे बुजवण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका स्थापत्य विभागाने केला आहे.