पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीबीआय अधिकारी आणि बँक अधिकारी असल्याचे सांगून व्हॉटस्ॲप व्हिडिओ कॉलवर ६० वर्षीय जेष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या या आरोपीला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी असलेल्या एका जेष्ठ नागरिकाला मनी लॉन्ड्रीगच्या अडीच कोटी रुपयांच्या फ्रॉड केसमध्ये अटक करण्याची भीती घालून फसवणूक केली. यात ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून १ कोटी ८ लाख रुपयांचा डिजिटल करन्सी चेक करून ती व्हेरिफाय करून परत करतो, म्हणत आरोपीने पिंपरी चिंचवड शहरातील एका जेष्ठ नागरिकाची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मयंक अशोककुमार गोयल या आरोपीला राजस्थानच्या जयपूर शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. या आधी सुद्धा या फसवणुकीच्या गुन्ह्यात साहिल मुदलियार, क्षितिज क्षीरसागर आणि ओंकार नाईक यांना अटक करण्यात आली आहे. या बाबतचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.