पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चहा आणि कॉफीमधून गुंगीचे औषध पाजून घर मालकाला बेशुद्ध करत मोलकरणीने तिच्या साथीदारांसोबत मिळून मौल्यवान दागिने तसेच रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना निगडी प्राधिकरण येथील परिसरात घडली आहे.
देवेंद्र गुमानमल लुंकड (वय-६७, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी अनामिका आणि तिचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनामिका ही फिर्यादी लुंकड यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम घरकाम करत होती. तिने तिच्या साथीदारांच्या मदतीने चौघाजणांनी मिळून लुंकड यांचा मुलगा आणि सुनेला चहा व कॉफीमधून गुंगी येण्याचे औषध दिले.
दरम्यान, दोघांना बेशुद्ध करून मिळालेली संधी साधून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड तब्बल १६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.