पिंपरी : शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून त्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवून एका संगणक अभियंत्याची 29 लाख 63 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 8 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत मारुंजी येथे घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पराग प्रफुल लोहगावकर (वय 35, सध्या रा. मारुंजी, ता. मुळशी मुळ रा. भगवान नगर, ता.जि. अमरावती) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 447480611104 क्रमांक धारक, ROWE PRICE STOCK PULLING GROUP D88 नावाचा व्हॉटसअप ग्रुप, IND SES नावाचे अॅप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे हिंजवडी येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत आहेत. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर 447480611104 या मोबाईल धारकाने मेसेज केला. त्यांना ROWE PRICE STOCK PULLING GROUP D88 या व्हॉट्सअॅप ग्रुपवर जॉईन होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना IND SES नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वीस संपादन करुन ट्रेडिंग करुन त्याद्वारे जास्त नफा कमावण्याचे आमिष दाखवले.
त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 29 लाख 63 हजार 599 रुपये घेतले. मात्र, त्यानंतर फिर्यादी यांना कोणताही नफा अथवा घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्णन कांदे करत आहेत.