पिंपरी : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालक तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनांवर शनिवारी ३० मार्च रोजी मोठी कारवाई केली आहे. वाकड येथील फिनिक्स माॅल परिसरात आणि थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४०६ वाहनांवर कारवाई करून तब्बल ४ लाख ३७ हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये शहरातील ‘गोल्डमन’ म्हणून ओळख असलेल्या वाहनावरही वाहतूक पोलिसांनी कारवाई करत दंड आकारला आहे.
‘गोल्डन गाईज’ वाहनचालकाला पोलिसांचा दणका
पिंपरी-चिंचवड शहरात महागडी आलिशान चारचाकी वाहन घेऊन फिरणाऱ्या वाहन चालकालाही वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. ‘गोल्डन गाईज’ म्हणून संबंधित वाहनचालकाने त्याच्या या चारचाकी वाहनाला सोन्याची पाॅलिश केले असल्याचे सांगण्यात येते. तसेच ‘गोल्डमन’ म्हणून संबंधित वाहनधारकाची ओळख आहे. त्याच्या या ‘गोल्डन’ चारचाकीत हायप्रोफाइल व्यक्ती तसेच सेलिब्रिटी नेहमीच दिसून येतात. तसेच ही गोल्डन चारचाकी शहरात कुठेही दिसल्यास बघ्यांची गर्दी होते. याच गोल्डमनच्या गोल्डन चारचाकी गाडीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या गाडीची काळी काच हटवली आहे. या कारवाईचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.
असा आकारला दंड
पिंपरी-चिंचवड येथील वाकड परिसरातील फिनिक्स माॅल येथे दिवसभरात ३०५ वाहनांवर २ लाख ५०० रुपये दंड आकारला आहे. चारचाकी वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. पहिल्यांदा केलेल्या कारवाईत ५०० रुपये त्यानंतरही काळ्या काचा आढळून आल्यास १५०० रुपये दंड आकारण्यात येतो. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, पदमजी पेपर मिल समोरील रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क केलेल्या ४७ वाहनांवर पोलिसांनी कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड आकारला आहे.