पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड आणि वाकड पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक केली आहे. गुंडांकडून पिस्तूल आणि दोन कोयते अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आनंद नामदेव दनाने (वय ३१, रा. विद्यानगर, चिंचवड) असे आहे. आरोपी आनंद याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर आनंदला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला.
चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव विकास उर्फ विक्या अंकुश भिसे (वय २७, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे आहे. विकासला दोन नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याला चिंचवड पोलिसांनी दळवीनगर येथून अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे.
तिसऱ्या कारवाईत वाकड पोलिसांनी माउली उर्फ ज्ञानेश्वर सुबराव पवार (वय २३, रा. पवारनगर, थेरगाव), अजय म्हस्के (रा. थेरगाव) यांना अटक केली आहे. अधिक माहितीनुसार, आरोपी थेरगाव येथे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीचे एक काडतूस जप्त करण्यात आले आहे.