पिंपरी: महापालिकेच्या वतीने रावेत पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना किवळे येथील आर्थिक दुर्बल गृह प्रकल्पातील सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ९ मे रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी म्हटले आहे.
रावेत प्रकल्पातील निवड यादी व प्रतीक्षा यादी क्रमांक एक आणि दोनमधील लाभार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य त्या तत्वावर किवळे येथील आर्थिक दुर्बल गृह प्रकल्पातील सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. किवळे येथील प्रकल्पाअंतर्गत एकूण ७५५ सदनिका आहेत. या सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटप करण्यात येणार आहेत. सदनिकेची किंमत १३ लाख ७१८ रूपये आहे. या प्रकल्पांमध्ये सदनिकेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह संमतीपत्र सादर करावे.
महापालिकेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना किवळे येथील सदनिकांचे वाटप करण्यात येईल. आधार कार्ड (सर्व कुटुंब सदस्यांचे), पॅन कार्ड (अर्जदार व सह-अर्जदार), जातीचा दाखला (अर्जदार), मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, चालू महिन्याचे वीज बिल, उत्पन्नाचा दाखला (२०२४-२५) किंवा आयटीआर किंवा फॉर्म १६, अधिवास प्रमाणपत्र, भाडे करारनामा किंवा संमतीपत्र (ज्यांना स्वतःची जागा नाही), दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) ही कागदपत्रे आवश्यक आहेत. चिंचवड गाव येथील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग ही कागदपत्रे सादर करावीत.
किवळे येथील सदनिका मिळविण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही एजंटांच्या प्रलोभनास बळी पडू नये. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी संमतीपत्राचा नमुना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडून घेवून जावा. कागदपत्रांसह सादर करावा.
अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका