पिंपरी : राज्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सर्वाधिक १८ सक्रिय रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. मात्र, ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर व्याधी आहेत, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
कोरोनाचे संकट पुन्हा ओढवल्यास महापालिकेने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. रूग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रूग्णालयातील खाटा, प्राणवायूसह सर्व तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज आहे. मात्र, सध्या करोना रूग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शहरात सध्या कोरोनाची लक्षणे दिसल्यास संशयित रूग्णांचे नमुणे घेऊन तातडीने चाचणी करण्यात येत आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढत आहेत. सर्दी, खोकल्याच्या रूग्णांची कोरोना चाचणी गरजेनुसार करण्यात येत आहे. वाढता कोरोना आणि कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन. १ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने आढावा घेण्यात आला.
शहरातील १८ रूग्णांपैकी १४ रूग्ण घरीच उपचार घेत असून, चार रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या सर्व रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
दरम्यान, येत्या चार आठवड्यांत देशात कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढू शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी INSACOG अहवालाच्या आधारे ही भीती व्यक्त केली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यांमधील आणि २०२० ते २०२२ पर्यंतच्या कोरोनाच्या ट्रेंडचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले आहे की, जानेवारी महिन्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे डिसेंबर ते जानेवारीदरम्यान दररोज रुग्णांची संख्या वाढली होती, मात्र फेब्रुवारी महिन्यात हा आलेख घसरण्यास सुरुवात झाली. यामुळे ख्रिसमस, नववर्षानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.