गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पिंपळगांव ते टोलनाका या दहा ते बारा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अशी पुणे प्राईम न्युज च्या माध्यमातुन 24 जुलै रोजी बातमी प्रसिध्द केली होती. या बातमीची दाखल घेत संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. या मार्गावरील दहा गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी खुटबाव, केडगाव, दापोडी, वरवंड, चौफुला या गावामध्ये यावे लागते. अशा या खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत असत.
पिंपळगांव ते टोलनाका अशा 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत होती. रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेकजण प्रवास करतात. नेहमीच हजारो वाहने या रस्त्यावरून जात येत असल्याने खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत होती. शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने जात नव्हती.
एक खड्डा चुकवित असताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन जावून होणारा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक, वाहन चालक अन प्रवाशातून नाराजी दिसून येत होती. हे काम टोलनाका वरून ताबडतोब सुरू झाल्याने सर्वच स्तरात आनंद व्यक्त होत आहे. परंतु या रस्त्याचे काम टोलनाका ते गलांडवाडी फाटा या 5 ते 6 किलोमिटरपर्यंतच होणार असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
यामुळे नागरिकांच्या आणखी समस्या जैसे थे असणार की काय? असे अनेक संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने पिंपळगाव ते टोलनाका अशा 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरूस्त करुन विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होणारा नाहक त्रास थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अर्थवट काम न होता पिंपळगांव ते टोलनाका असे पुर्ण काम व्हावे व ते काम उत्तम दर्जाचे व्हावे .
शिवाजी वांझरे – प्रवासी