लोणी काळभोर : तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या कामाला उशीर झाला होता. पण आता काम सुरु झाले असून, स्थानिक नागरिक व पर्यटकांची सोय व्हावी म्हणून हा रस्ता दर्जेदार तयार करण्यात येणार असल्याचा विश्वास हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर यांनी व्यक्त केला.
ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिर ते तीर्थक्षेत्र रामदरा या बहुप्रतिक्षित रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामाला तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, याचा शुभारंभ युगंधर काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच प्रियांका काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, अमित काळभोर, सचिन काळभोर, सागर काळभोर, श्रीनिवास काळभोर आदी उपस्थित होते.
युगंधर काळभोर म्हणाले, ”श्रीमंत अंबरनाथ मंदिर ते नवीन कालवा दरम्यान साडे पाच मीटर म्हणजेच १८ फूट रस्ता होणार असून, दोन्ही बाजूंना ३-३ फूट साईड पट्ट्या असा एकूण २४ फूट रुंदीचा रस्ता होणार आहे. नवीन कालवा ते तीर्थक्षेत्र रामदरा दरम्यान १२ फूट रस्ता व दोन्ही बाजूंना ३-३ फूट असा एकूण १८ फूट रुंदीचा रस्ता होणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
रस्त्याचे काम सुरु झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
”गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम प्रतिक्षेत होते. मात्र, आता या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक लोकांनी या रस्त्यासंदर्भात उलटसुलट चर्चा केल्या होत्या. सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करुन अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे,” असे सरपंच योगेश काळभोर यांनी सांगितले.
भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ
यावेळी नागेश काळभोर म्हणाले की, ”तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे शहर व परिसरातील नागरिकांना धार्मिक, नैसर्गिक पर्यटन करण्यासाठी व हौशी तरुणांना ट्रेकींगचे प्राथमिक धडे गिरवण्यासाठी असलेला सह्याद्रीच्या पर्वत रांगातील डोंगर यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे हा रस्ता होणे आवश्यक होते”.