पुणे : पुण्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता शहरातील हडपसर भागात असलेल्या वैदूवाडी उड्डाणपुलावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे मनपाच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीची पिकअप टेम्पो रिव्हर्स विनाचालक सुसाट सुटला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. ही घटना रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली आहे. हा रिव्हर्स जाणारा टेम्पो डिव्हायडरला धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या वैदूवाडी उड्डाण पूलावर पुणे महानगर पालिकेच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीची चार चाकी टेम्पो ड्रायव्हर नसूनही रिव्हर्स गियरमध्ये भरधाव वेगानं पाठीमागे जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच या ड्रायव्हरच्या जागेवर कोणीही व्यक्ती दिसत नाही. अत्यंत विचित्र आणि जिवेघेणा असा अंगावर काटा आणणार व्हिडिओ आहे.
या टेम्पोवर पुणे महानगर पालिका असं लिहिलेलं आहे. मात्र, हा टेम्पो अशा प्रकारे रिव्हर्स का जात आहे, याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.अखेर हा टेम्पो डिव्हायडर धडकल्यानं आणि मध्य रात्रीच्या सुमारास रस्त्यावर वाहनं कमी असल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.