पुणे: गणेशोत्सवात महिला तसेच तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून असे गैरप्रकार करणाऱ्यांची नावे व छायाचित्रे भर चौकात होर्डिंगवर झळकावण्याचा फंडा पोलिसांनी शोधून काढला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नुकत्याच याबाबतच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गणेशोत्सवाचा प्रारंभ येत्या शनिवारी (दि.७) होणार आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात देशातील पुल वेगवेगळ्या भागातून नागरिक येतात. मात्र, काहीजण या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला व तरुणींची छेड काढतात. याला लगाम घालण्यासाठी कड़क उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. मुलीची छेड काढणाऱ्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्सवामध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, महिलांचे दागिने चोरणे तसेच मोबाईल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मध्य भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
महिला पोलिसांची साध्या वेशातील पथके तसेच दामिनी पथके गर्दीत गस्त घालणार आहेत. गर्दीत महिलांची छेड काढताना तसेच अश्रील कृत्य केल्याचे आढळून आल्यास त्यांची छायाचित्रे काढण्यात येणार आहेत. छेड काढणाऱ्यांचे नाव, पत्ता छायाचित्र फलकावर छापण्यात येणार आहे. या स्वरुपाचे फलक चौकाचौकात लावण्यात येणार आहेत. तसेच, संशयित आरोपींना वठणीवर आणण्यासाठी त्यांची धिंड काढण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मध्य भागात अठरा पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. उत्सवाची सांगता होईपर्यंत मदत केंद्रांचे कामकाज अहोरात्र सुरू राहणार आहे. या केंद्रात स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच गर्दीत चोरी करणाऱ्या चोरट्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. मोबाईल चोरी, महिलांकडील दागिने चोरणाऱ्या चोरट्यांची माहिती घेणे आणि त्यांची यादी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे. उत्सवाच्या कालावधीत सहा ठिकाणी शीघ्र कृती दल तैनात करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत या दलाचे पथक मनोऱ्यावरून गर्दीवर नजर ठेवणार आहेत.