शिक्रापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठांसाठी सुरु केलेल्या ‘आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन’ या योजनेचं जाहिरात फलक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या जाहिरातीमध्ये तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो छापण्यात आला आहे. यामुळे कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी वडिलांचे दर्शन घडवण्याची मागणी सदर व्यक्तीच्या कुटुंबियांनी केली आहे.
पुण्याच्या शिरुड तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. ज्ञानेश्व तांबे हे गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता झाले असल्याने त्यांच्या कुटुंबासह नातेवाइकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ज्ञानेश्वर तांबे हे कुटुंबियांना सापडले नाहीत. तर त्यांची भेट होणे शक्य नाही, असे कुटुंबीयानी गृहीत धरले.
दरम्यान या घटनेला तीन वर्ष पूर्ण होत असून तीन वर्षानंतर नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
आमच्या वडिलांचे दर्शन घडवून द्या; मुलाची मागणी
ज्ञानेश्वर तांबे यांचा मुलगा भरत तांबे म्हणाले की, आमचे वडील गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता आहेत. आम्ही त्यांचा सगळीकडे शोध घेत आहोत, मात्र ते आम्हाला सापडत नाहीत. आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसत असल्याने आमच्या सह आमच्या नातेवाइकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहेत. त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडवून द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करत आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडवून देण्याची मागणी भारत तांबे यांनी केली.