पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैसर्गिक कृत्य करायला लावून त्याचे फोटो काढून विविध मोबाईलवरुन फोन करुन मानसिक त्रास दिल्याने एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संकेत राजेश मोहिले (वय-२६, रा. भवानी पेठ तसेच मोहननगर, धनकवडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळजाई येथील टेकडी परिसरात नोव्हेबर २०२३ ते २५ नोव्हेबर २०२४ या दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलगा दहावीमध्ये शिक्षण घेत होता. आरोपी संकेत मोहिले हा त्याला तळजाई येथील टेकडीवर घेऊन गेला. तेथे त्याने आपले कपडे काढून मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. एवढंच नाही तर, त्याचे त्याने फोटो देखील काढले. त्यानंतर त्याला विविध मोबाईल नंबरवरुन सतत फोन करुन त्रास देत होता. त्यामुळं त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते. या त्रासाला कंटाळून मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार अधिक तपास करीत आहेत.