पुणे: पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक झाले आहे. पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पर्वती टेकडीवर बाजीराव पेंशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे संग्रहालयाचा विकास होण्यासाठी चंद्रकांत पाटील आग्रही आहेत. जिल्हा नियोजन, आमदार निधी आणि लोकसहभागातून हा विकास करण्यात येत आहे. यामध्ये पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह भारताचा उज्ज्वल इतिहास आणि पेशवेकालीन इतिहासावर आधारित भित्तीचित्रे साकारण्यात आली आहेत.
याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पहिल्या टप्यातील कामाचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच, पुढील टप्प्याचेदेखील काम लवकरच सुरू करणार आहे. कामांची यादी तयार करून सादर करण्याच्या सूचना देवदेवेश्वर संस्थान आणि स्मारक विकास समितीला करण्यात आल्या आहेत.