लोणावळा (पुणे) : कार्ला-मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पर्यायी पुलावरून कार्ला येथील एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी ५ जुलै रोजी वाहून गेलेल्या व्यक्तीच शोध सकाळपासून सुरू असून अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. भीमा पवार (वय अंदाजे ५० वर्ष, रा. कार्ला, ता. मावळ) असे या वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
व्यक्ती पुलावरून वाहून गेल्याची माहिती मिळताच लोणावळ्यातील शिवदुर्ग पथक व प्रशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक नागरिक यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, नदीपात्रात जलपर्णी असल्यामुळे शोध कार्यात अडथळा येत आहे.
कार्ला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल जीर्ण झाला असून तो पूल पाडून त्या ठिकाणी नव्याने पूल बांधण्याचे काम सुरू आहे. काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र, त्या मागणीकडे काहीशी दुर्लक्ष झाल्याने पावसाळा सुरू झाला, तरी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे.
दरम्यान, या नवीन पुलाच्या शेजारी नागरिकांना ये-जा करण्यासाठी नदीपात्रामधून पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. पहिल्याच पावसामध्ये हा पूल पाण्याखाली गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागांने काही प्रमाणात भरणी केली होती. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसात या पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी बंद केला होता.