पुणे : कर्जाचे थकीत हप्ते मागितल्याचा रागात दोघांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना कोंढवामध्ये शिवनेरीनगर परिसरात ही घटना घडली. त्याप्रकरणात बाबू ऊर्फ मेहबूब शेख (वय २८), अमीर मुलाणी (वय ३२, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हसन शेख (वय ४०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी बुधवारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बाबू शेख आणि फिर्यादी हसन शेख एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हसन यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे बँकेतून कर्ज काढून बाबू शेख याला दिले होते. मात्र, त्याने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. चार महिन्यांचे हप्ते थकीत होते. हसन मित्रासमवेत कर्जाच्या हप्त्यांचे पैसे मागण्यासाठी आरोपी शेखच्या दुकानाजवळ गेले होते.
फिर्यादीने पैसे मागताच आरोपीला राग आला. पूढे हा राग अनावर होताच बाबू शेख याने हसन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला साथ देत दुकानात काम करणारा कामगार अमीर मुलाणीने हसन यांच्या डोक्यात बांबूने मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.