लोणी काळभोर: आगामी गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सगळीकडे लगबग सुरू झाली आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मूर्तिकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात मारण्याच्या तयारीत आहेत. लहान मुलांपासून जेष्ठ नागरिक गणेशोत्सवात सहभागी होतात. हा उत्सव भारतासह अनेक देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, यंदा गणेशाची मूर्ती शाडूची की पीओपीची घ्यावी, असा संभ्रम गणेश भक्तांमध्ये निर्माण झाला आहे. तर मग जाणून घेऊया कोणती मूर्ती घ्यायला हवी ते…..
पर्यावरण बदलास अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी होय. पीओपी जर झऱ्याच्या उगमस्थानी चिकटून राहिले तर पाण्याचा स्रोतच बंद होतो. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सागरकिनारी पहा. भयानक स्थिती दिसते. निर्माल्यावर पाणी शिंपडले की त्याचे विसर्जन होते. त्याचा खत तयार करण्यासाठी वापर केला जावा. निर्माल्य पाण्यात टाकू नये, अशी ओरड पर्यावरणप्रेमींकडून नेहमीच होत असते. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्तीं हा पर्याय समोर आला.
शाडू मातीची मूर्ती साकारण्यात वेळ लागत असला, तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींना पसंती देणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती हा उत्तम पर्याय असला, तरी पीओपीच्या गणेश मूर्ती साकारणाऱ्यांना छुपे राजकीय पाठबळ मिळते. म्हणूनच पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालणे सरकारला आजवर शक्य झाले नाही.
राजकीय इच्छाशक्ती असली, तर काहीही शक्य नाही, असे म्हटले जाते. परंतु, पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात सरकार कुठे तरी कमी पडते. एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन राज्य सरकारकडून केले जात असताना पीओपीच्या गणेश मूर्तींचा आग्रह का? यात ‘अर्थपूर्ण’ राजकारण दडलंय का? अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
आपले भारतीय सण-उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हाच त्यांचा मूळ हेतू असतो. सभोवतालचा निसर्ग संपन्न असेल तरच माणसाला सुखासमाधानाने जगता येईल? त्यामुळे येथून पुढील सर्व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करा. परंतु, हा उत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे पुढील काळात पीओपीच्या गणेश मूर्तींऐवजी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं अधिक असतील, असा विश्वास व्यक्त करणे चुकीचे ठरणार नाही.