केडगाव: संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने सर्वत्र कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची चांगलीच धावपळ सुरु असून आपल्याकडे कसे मतदान खेचता येईल याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती. कारण बारामती मतदारसंघात प्रथमच पवार घराण्यात फूट पडून पवार विरुद्ध पवार ही लढाई होत आहे. येथे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी आपले आपले कार्यकर्ते या निवडणुकीत कामाला लावले होते.
पण, या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बाबतीत महायुतीचे परडे जड होते. कारण आजी माजी आमदारांची यंत्रणा एकत्र असल्यामुळे कार्यकर्त्यांचा भरणा मोठा होता. तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर त्यांचे कार्यकर्ते पाहायला मिळाले. या उलट महाविकास आघाडीचे गावागावात बूथवर कार्यकर्तेच नव्हते. मतदान करून घेण्यासाठी कसलीही यंत्रणा नव्हती. तरी पण बहुतेक गावांमध्ये तुतारीची सुप्त लाट चालली असल्याची चर्चा अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळाली. यामुळे गाव पुढाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पुढाऱ्यांनी मोठ्या नेत्यांना खुश करण्यासाठी आपल्या गावात काहीच अडचण येणार नाही, असे कळवले होते. आपण लीडवर असू, पण तसे काही पाहायला मिळाले नाही .त्यात समोरील बाजूस विरोधकच नाही, त्यांना कार्यकर्ते आणि बूथ प्रमुख मिळणार नाही, असे समजून फाजील आतमविश्वास बाळगला होता.
पण झाले उलटे. लोकांचा (मतदारांचा) कल हा तुतारीच्या लाटेकडे आहे, हे त्यांना उशिरा लक्ष्यात आले. तोपर्यंत फार उशीर झाला होता, कारण लोकांना समजून सांगूनही लोक दुसरीकडेच मतदान करताना पाहायला मिळाले. त्यामुळे येणाऱ्या निवडणूक निकालात आपल्या गावचे मतदान हे आपल्या उमेदवारांना लीड देण्याऐवजी विरोधी उमेदवारांना लीड भेटल्याचे बऱ्याच गावांत घडले आहे. त्यामुळे आपल्या नेत्यांना आता काय सांगायचे? हा मोठा प्रश्न या गाव पुढाऱ्यांना पडला असणार हे नक्की.
कट्टर विरोधकांचे एकाच बुथवर एकत्र काम
दौंड तालुक्यात कुल आणि थोरात असे दोन गट हे एकमेकांचे कट्टर विरोधक असून ते बारामती लोकसभा निवडणुकीत एकत्र काम करताना बूथवर पाहायला मिळाले. पण आगामी विधानसभा निवडणुकीत हे कार्यकर्ते एकत्र असतील का? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.