पुणे : शहराचा गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचबरोबरच वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवा प्रदूषण याबाबतचे प्रश्नही ओघानेच निर्माण झाले आहेत. या प्रश्नांमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर उपाययोजना काय असाव्यात, याची उत्तरेही आता पुणेकरांकडूनच जाणून घेण्यात येणार आहेत. पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडविण्यासाठी ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ आजपासून (ता. ५) सुरू होत आहे. या अभियानात समस्यांवरील उत्तरेही पुणेकरांकडूनच जाणून घेऊन ती संबंधित विभागाकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
‘#वेकअप पुणेकर’चे संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी प्रवीणकुमार बिराजदार, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे-पाटील उपस्थित होते. जोशी म्हणाले की, पुण्याचा विस्तार होतोय, लोकसंख्याही वाढत आहे. नागरी समस्या निर्माण होत आहेत. या प्रश्नांवर उपाययोजना आता पुणेकरांकडूनच जाणून घेण्यात येतील. त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल आणि जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडविणे अधिक सोपे जाईल. या उद्देशाने ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ उभी करीत आहोत. यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘#अडकलाय पुणेकर’
पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘#अडकलाय पुणेकर’ मोहीमही राबविण्यात येणार आहे. पुण्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. शहराच्या सर्व भागांतील वाहतुकीची कोंडी होणारी ठिकाणे, सिग्नल या ठिकाणी ‘#अडकलाय पुणेकर’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेतील स्वयंसेवक वाहनचालकांकडून प्रश्नावलीचा अर्ज भरून घेतील. या प्रश्नावलीत समस्यांवरील उत्तरेही मिळणे अपेक्षित आहेत. ही मोहीम १५ दिवस राबविल्यानंतर प्रश्नावलीच्या आधारे माहिती संकलित केली जाईल. पुणेकरांनी सुचविलेल्या उपाययोजनांची छाननी करून ती राबविण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ योजनेमार्फत कसोशीने प्रयत्न करण्यात येतील, असेही जोशी यांनी सांगितले.