लोणी काळभोर: पुण्यात तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत पोचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा जेष्ठ नागरिकांसह लहान मुलांना आगोदरच मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात मागील तीन दिवसांपासून विजेच्या लपंडावाचा खेळखंडोबा सुरु आहे. रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात हैराण झाला आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील रहिवाशी भागात गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच वीजपुरवठा न सूचना देता खंडित केला जात आहे. साधारणत: तीन ते पाच तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे अपार्टमेंट-सोसायट्यांमध्ये पाण्याच्या प्रश्न उद्भवत आहे. पाण्याअभावी महिला वर्गाची कामे रखडतात. तर, चाकारमान्यांना त्यांच्या आस्थापनाला जाण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यातच वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके सुकू लागली आहे. विजेच्या लपंडावामुळे विहिरीवरील कृषीपंप बंद पडल्याने शेतातील तरकारी पिकाची लागवड खोळंबली आहे. सतत भारनियमन, दुरुस्तीच्या कामामुळे वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण आणि बाकी इतर कारणांमुळे कायमच वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे भारनियमनाच्या संकटाबरोबर इतर दुरुस्तीच्या संकटांशी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
विजेअभावी शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने कडक उन्हामुळे शेतातील पिके सुकू लागली आहे. त्यामुळे योग्य दाबाने सुरळीत वीज पुरवठा करावा, ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे पिके करपू लागली आहेत. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असून, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजप्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.
दरम्यान, पूर्व हवेलीतील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्येक गुरुवारी विद्युत पुरवठा खंडित केला जातो. तरी देखील अनियमित वीजपुरवठ्यामुळे अनेकांना विजेच्या उपकरणांचा आधार घ्यावा लागत आहे. तर वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन देखील भरमसाठ देयके येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
विद्युत उपकरणे नादुरूस्त
पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणावर विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने कित्येक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. दैनंदिन जीवनशैलीवर याचा परिणाम होत आहे. रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरातील नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. या भागात डासांचा प्रादूर्भाव असल्याने रात्रीची झोप उडाली आहे. दैनंदिन दिनचर्येवर याचा परिमाण झाला आहे.
कदमवाकवस्तीतील वीज पुरवठा वारंवार जातो. त्यामुळे घरातील कामे खूप रखडली जातात. त्यातच दुपारच्या वेळेस बाळ झोपल्यानंतर काम करण्यास वेळ मिळतो. मात्र लाईट गेल्याने काम रेंगाळते आणि उकाड्याने बाळही रडते. लाईट नसल्याने सगळा गोंधळ उडून जातो. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा.
पल्लवी गायकवाड (गृहिणी, कदमवाकवस्ती, ता.हवेली)