संदीप बोडके
लोणी काळभोर, ता.१४ : थेऊरच्या (ता. हवेली) मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्या कार्यालयातील दोघांना सात हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. तर या प्रकरणात जयश्री कवडे यांनी लाच मागणीस व लाच रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीने महसूल विभागात केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोलवडी (ता. हवेली) येथील शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आजीच्या आईच्या वडिलांचे नाव कमी होते. त्या नावाची नोंद पुनर्स्थापित करण्यासाठी थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्या कार्यालयातील दोघांनी लाच मागितली होती. याप्रकरणी योगेश कांताराम तातळे (वय २२, खाजगी संगणक ऑपरेटर रा. चौधरी पार्क, बाबु कदम चाळ, दिघी) व विजय सुदाम नाईकनवरे (वय ३८ वर्ष, व्यवसाय एजंट, रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एका २५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
दरम्यान, महसूल विभागातील या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर या कारवाईमुळे आपली महसूलमधील कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. इतकेच नाहीतर काही नागरिकांनी बुधवारी फटाके फोडत आनंद साजरा केला.
भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिकवेल धडा
महाराष्ट्रात सर्वात जास्त भ्रष्टाचार हा महसूल विभागात होत आहे. कायदेशीर कामे करण्यासाठी नागरिकांना प्रोटोकॉलच्या नावाखाली वेठीस धरले जाते. त्यामुळे थेऊर येथे झालेली कारवाई भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवेल. तसेच या कारवाईवर खुश आहे.
– भाऊसाहेब गायकवाड, माजी चेअरमन, कोलवडी विविध कार्यकारी सोसायटी
‘एसीबी’ने केलेली कारवाई योग्यच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई योग्य केली आहे. ही कारवाई अगोदरच व्हायला पाहिजे होते. थेऊरच्या मंडलाधिकारी सरळमार्गी कामे करत नव्हत्या. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
– गणेश कुंजीर, शेतकरी, थेऊर. ता. हवेली.
हस्तकामार्फत केली जात होती पैशांची मागणी
थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे या पैसे खाण्यासाठी महसूलमधील कामे जाणूनबुजून विलंबाने करत होत्या. खातेदार शेतकऱ्यांना अगदी तुच्छतेची वागणूक देत होत्या. फेरफार मंजूर करण्यासाठी त्यांच्या हस्तकामार्फत पैशांची मागणी करत होत्या. त्या महसूली कामांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या नियमांची भीती दाखवून वेठीस धरत होत्या. त्यामुळे सर्वच नागरिक त्यांच्या भ्रष्ट कारभाराला वैतागले होते.
– रमेश भोसले, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
‘एसीबी’च्या कारवाईचे मनापासून स्वागत
महसूलमधील कामे करण्यासाठी लाचेची मागणी होत होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. लाच मागितल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला होता. मात्र, आता या कारवाईमुळे शेतकऱ्यांची कामे विनाअडथळा होणार आहेत. या कारवाईचे मनापासून स्वागत करतो.
– सागर कुंजीर, शेतकरी, थेऊर ता. हवेली
शेतकऱ्यांशी अरेरावीची करत होत्या भाषा
थेऊरच्या मंडल अधिकारी शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा बोलत होत्या. चुकीची माहिती महसूल खात्याला पाठवित होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप अडचणी येत होत्या. मात्र, थेऊर हे चिंतामणीचे गाव आहे. या ठिकाणी अति तेथे मातीच आहे. त्यामुळे या झालेल्या कारवाईमुळे खूप समाधानी आहे.
– आणा बोडके, शेतकरी, थेऊर, ता. हवेली.