पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरात आजारी प्राण्यांची रुग्णालयात ने-आण करणाऱ्या ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरेंद्रसिंग शैलेंद्रसिंग कुम्पावत (वय-48, रा. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, चंदननगर, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, ॲम्ब्युलन्स चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून, विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.13) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास लोहगावमधील फॉरेस्ट पार्क रस्ता परिसरात घडली आहे.
याप्रकरणी ॲम्ब्युलन्सचालक (एमएच 14 के एन 4364) संजय चण्णाप्पा मुल्लोळी (वय-26, रा. वाडेबोल्हाई, नगर रस्ता, ता. हवेली) याला अटक केली आहे. याबाबत मयत सुरेंद्रसिंह यांचा लहान भाऊ महेंद्रसिंग शैलसिंग कुम्पावत (वय-43 रा. नवी भाजी मार्केट, चंदननगर-खराडी रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रसिंह हे लोहगाव परिसरातील फॉरेस्ट पार्क येथून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्ता ओलांडणाऱ्या सुरेंद्रसिंग यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्रसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गुन्हे सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुल्लोळ याला ताब्यात घेतले. आरोपी मुल्लोळ याने मद्यप्राशन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.