पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथावडे परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पत्रकाराला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (७ जुलै) रात्रीच्या सुमारास घडली. शरद वसंत गायकवाड (वय-४२, रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद गायकवाड हे पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते. गायकवाड यांची पत्नी गावावरून बस ने पिंपरी चिंचवडमध्ये परतली होती. वाकड येथे उतरल्यानंतर पत्नीला आणण्यासाठी गायकवाड हे गेले होते. त्यावेळी मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथे डिकेथ लोन समोर शरद गायकवाड हे रस्ता ओलांडत होते.
त्यावेळी मुंबईहून आलेल्या एका ट्रकने गायकवाड यांना जोराची धडक दिली. या अपघातात गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ट्रक चालकाच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.