पुणे : आळंदी रस्त्यावरील फुलेनगर येथील लालूजी गोगले भुयारी मार्गात साठलेल्या मैलापाण्यामुळे एका पादचाऱ्याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मृतदेह दीड दिवस भुयारी मार्गात पडून होता. सुरक्षेसाठी नियम पाळत भुयारी मार्गातून जाण्याची अशी जीवघेणी शिक्षा त्यांना मिळाल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. देशात स्वच्छ सर्वेक्षणात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या पुणे शहरातील अस्वच्छ भुयारी मार्गात घडलेल्या या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेने भुयारी मार्ग केवळ शोभेसाठी बनविले आहेत की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
अविनाश जोशी (वय ५३) शुक्रवारी (ता. ३) रात्री आळंदी रस्त्यावरील भुयारी मार्गाने बीआरटी थांब्यावर जात होते. भुयारी मार्गात प्रचंड अस्वच्छता, मैलापाण्याचे साम्राज्य असल्याने सहसा या मार्गाचा कोणी वापर करीत नाही. या मार्गावरून जोशी एकटेच जात असताना त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. त्यांच्या मदतीला कोणीच आले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
देशात स्वच्छ सर्वेक्षणात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या पुणे शहरातील हा भुयारी मार्ग म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. भुयारी मार्गात दिवे नाहीत. त्यामुळे दिवसासुद्धा कोणी या भुयारी मार्गाचा वापर करत नाहीत. वारंवार तक्रार करूनही भुयारी मार्गाची स्वच्छता होत नाही. याची तक्रार अनेक वेळा स्थानिकांनी केली आहे. भुयारी मार्ग बंद करा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही काँग्रेसच्या वडगाव शेरी मतदारसंघाच्या अध्यक्षा शिवानी माने यांनी दिला आहे.
फुलेनगर येथील अविनाश जोशी एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्यांच्या वयोवृद्ध आईने दोन्ही पाय गमावल्यामुळे आईची सुशृषा करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली होती. वडील देखील वृद्ध असल्याने दोघांची जबाबदारी अविनाश यांच्यावर होती. त्यामुळे त्यांचे परिसरात श्रावणबाळ म्हणून कौतुक होत असे. दरम्यान, या अपघातानंतर ते घरी न आल्याने वृद्ध माता-पित्याला अश्रू अनावर झाले. शेजारी धीर देत होते. मात्र, त्यांचे लक्ष दरवाजाकडे होते. औषधांची वेळ देखील टळून जात होती. दरम्यान, अविनाश यांचा मृत्यू झाल्याचे कळले. ही धक्कादायक बातमी समजल्यावर आई-वडिलांनी फोटलेला टाहो मन हेलावणारा होता.
आई-वडिलांकडे लक्ष देण्यासाठी अविनाशने नोकरी सोडली होती. तो आर्थिक विवंचनेत होता. मात्र, आई-वडिलांची सेवा मनापासून करीत होता. त्याचा मृत्यू झाल्यामुळे वृद्ध आई-वडिलांवर आभाळ कोसळले आहे, अशी प्रतिक्रीया अविनाश यांचे बालमित्र उमेश माने यांनी व्यक्त केली.