राजेंद्रकुमार शेळके
पुणे : मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालयात “शांतता पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्यामध्ये १६ ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालय येथे “पुणे पुस्तक महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणाऱ्या तसेच वाचन संस्कृती जपणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमांबरोबरच एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम “शांतता, पुणेकर वाचत आहेत” आपण जिथे असाल तिथे आपल्या आवडीचे पुस्तक वाचन करणे हा उपक्रम घेण्यास शासनाने महाविद्यालयाला कळविले होते. त्यानुसार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बुद्रुक येथे १४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये “शांतता, पुणेकर वाचत आहेत” हा उपक्रम महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे राबविण्यात आला.
या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आवडीचे पुस्तक वाचन केले. वाचनाच्या साहित्यामध्ये कथा, कादंबऱ्या, चरित्रे, स्पर्धा परीक्षा व इतर अवांतर साहित्य उपलब्ध होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रितेश पाटील यांच्या मार्गदर्शखाली ग्रंथपाल प्रा. केतन डुंबरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.