पिंपरी: अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झालेले शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असून पूर देखील ओसरला आहे. शहरात ज्या ठिकाणी चिखल अथवा कचरा साचला आहे, त्या ठिकाणी तात्काळ साफसफाई करून परिसर निर्जंतुकीकरण करावा, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु असून त्याबाबत आढावा घेण्यासाठी चिंचवड येथील अॅटोक्लस्टर येथे बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, डॉ. ज्ञानदेव झुंजारे, संजय कुलकर्णी, मनोज सेठिया, उपआयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, डॉ. अंकुश जाधव, सिताराम बहुरे, किशोर ननावरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह संबधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आवश्यक उपाय योजनेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना 5 लाख रुपये
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेल्या पूर परिस्थितीचा आयुक्त सिंह यांनी आढावा घेतला. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी ५ लाख रुपये तातडीच्या आवश्यक उपाययोजना करण्यासाठी देण्यात आले असून योग्य नियोजन करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नदी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास त्याची तातडीने पूर्वसूचना नदीकाठच्या रहिवाशांना देण्याची कार्यवाही संबधित विभागाने करावी, साथीचे आजार होणार नाही यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी करुन त्याबाबत आवश्यक दक्षता घ्याव्यात, रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी, ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचले आहे किंवा पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणी पाणी उपसा करण्याची कार्यवाही करावी आदी सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले आहे. ही तुकडी शहरात मुक्कामी असून आपत्कालीन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
साफसफाईचे काम सुरु
दरम्यान, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे. शहरात विविध ठिकाणी युद्धपातळीवर साफसफाईचे काम सुरु आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरु आहे. तुटलेले चेंबर्स बसविण्यात येत असून पाणी उपसा यंत्रणेद्वारे पाणी साचलेल्या भागातील पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी काम पूर्ण झाले असून शहरातील सर्व भागात पाहणी करुन उपाय योजना करण्यात येत आहेत. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने त्यांना निवारा केंद्रात सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते. तेथे त्यांना आवश्यक सुविधा, भोजन तसेच वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे. सद्यस्थितीत नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली असून पावसाचे प्रमाण देखील काही अंशी कमी झाले असल्याने निवारा केंद्रातील काही नागरिक त्यांच्या घरी जात आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले असून परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत आहे. तरीही, नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष
दक्षतेच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या ०२०-६७३३११११ किंवा ०२०-२८३३११११ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.