पिंपरी (पुणे): नाकाबंदीमध्ये तपासणी करत असताना एका वाहनातून पोलिसांनी दहा लाखांची रोकड पकडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने गुरुवारी (दि. ७) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास चाकण येथे नाशिक महामार्गावर महाराजा हॉटेलच्या बाजूला ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ‘सरप्राईज चेकिंग’ केले असता प्रशांत तुकाराम गाडे, शिवाजी कांताराम गव्हाणे (दोघे रा. चाकण) यांच्याकडे १० लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रोकड जवळ बाळगण्याबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर पंचनामा करून रोकड ताब्यात घेऊन चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. तसेच निवडणूक अधिकारी यांना देखील कळविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.