पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागात मानधनावर नियुक्त केलेल्या माळी कर्मचाऱ्यांची मुदत संपली आहे. मात्र, माळी पुरविण्याच्या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुन्हा मानधनावर नियुक्त केलेल्या या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेने वृक्षरोपण केलेल्या वृक्षांची उन्हाळ्यात देखभाल करण्यासाठी माळी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तसेच, उद्यान विभागामार्फत देखभाल केली जाणारी उद्याने, रस्त्यावरील दुभाजक, वाहतूक बेटे, पुतळे तसेच, इतर ठिकाणी देखभालीसाठी माळी कर्मचाऱ्यांची नियुक्त केले जातात. उद्यान विभागाकडे केवळ १० माळी कर्मचारी आहेत. त्यासाठी उद्यान विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मानधनावर माळी कर्मचारी नेमण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाने दिला आहे.
त्यानुसार गणेश खिंड, औंध येथील राहुरी कृषी विद्यापीठ माळी प्रशिक्षण केंद्र आणि बारामती कृषी विद्यापीठाकडे १०० प्रशिक्षणार्थी माळी कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. एकूण ४३ माळी कर्मचारी १९ एप्रिल २०२३ पासून रूजू झाले. त्यापैकी ३७ कर्मचाऱ्यांचा ११ महिन्यांचा कालावधी १८ मार्च २०२४ ला संपला आहे. त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यापैकी ३२ कर्मचारी रूजू झाले. त्यांची मुदतवाढ २८ ऑक्टोबर २०२४ ला संपली. तसेच, उद्यान विभागाकडून ४७ कर्मचारी नेमण्यात आले होते. त्याची मुदत ८ सप्टेंबर २०२४ ला संपली आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आहे. तसे कर्मचारी रूजू झाले आहे. या प्रस्तावास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.