पिंपरी-चिंचवड: विधानसभा निवडणुकांनंतर आता (PCMC Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Pune Election) निवडणुकांतही दुबार मतदारांचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये एकूण 17 लाख 12 हजार 151 मतदारांपैकी तब्बल 92 हजार 664 दुबार नावे आढळून आली आहेत. मतदारांचे स्थलांतर, पत्ता बदल, तसेच ऑनलाइन नोंदणीतील त्रुटी यामुळे ही स्थिती उद्भवल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्राप्त केलेली दुबार मतदारांची यादी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालये, सावित्रीबाई फुले सभागृह, मुख्य इमारत आणि अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Breaking News)

महापालिकेने प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत, सभागृहात आणि मुख्य इमारतीत स्वतंत्र कक्ष सुरू केले असून, नागरिकांनी आपल्या प्रभागातील यादी तपासून दुबार नावे, चुकीचे पत्ते किंवा नोंदी नसल्यास तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 2017 नंतर शहरातील मतदारसंख्येत मोठी वाढ नोंदली गेली असून, त्या वेळी असलेली 11 लाख 92 हजार 89 मतदारसंख्या आता 17 लाख 12 हजार 151 इतकी झाली आहे. लोकसंख्या वाढ व नवमतदारांचा सहभाग ही वाढीची प्रमुख कारणं असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
प्रारूप याद्यांतून 1 हजार 740 नावे विविध कारणांमुळे वगळली असून, यात स्थलांतर, मृत्यू किंवा गैरपात्र मतदारांचा समावेश आहे. 32 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वाधिक 74 हजार 340 मतदार तर प्रभाग क्रमांक 23 मध्ये सर्वात कमी 34 हजार 765 मतदार आहेत. आगामी निवडणुकीत दुबार मतदान टाळण्यासाठी अशा मतदारांच्या नावासमोर दोन स्टार (*) देण्यात आले असून, ते कोणत्या प्रभागात मतदान करणार याची हमीपत्रे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाच्या मते, या उपाययोजनांमुळे मतदान प्रक्रियेतील अनियमितता नियंत्रणात यायला मदत होणार आहे.







