पिंपरी : महापालिकेत नागरिकांना भेटीसाठी निश्चित केलेल्या वेळेत न भेटणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आयुक्त शेखर सिंह यांनी खुलासा मागितला आहे. यामध्ये विभागप्रमुख असलेल्या ३४ अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांना खुलासा सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महापालिकेचे कार्यालयीन कामकाज सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहापर्यंत सुरू असते. या वेळेत विविध कामानिमित्त नागरिक महापालिकेच्या विविध कार्यालयात, विविध अधिकाऱ्यांकडे येत असतात. परंतु, अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. याबाबत तक्रारी वाढल्याने आयुक्त सिंह यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस दुपारी तीन ते सहा ही वेळ निश्चित केली. त्यानुसार कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहण्याचे निर्देश दिले. आयुक्तांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाने सर्व कार्यालयाची पाहणी केली.
त्यामध्ये ३४ अधिकारी एकपेक्षा अधिक वेळा गैरहजर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांना आयुक्तांच्या आदेशानुसार नोटीस दिली असून दोन दिवसांत लेखी खुलासा मागवला आहे. काही अधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला आहे. तसेच यापुढे नागरिकांना भेटण्याच्या वेळेत अधिर्कायांनी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले, असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.