पिंपरी : पुणे महापालिकेत व्यवसाय परवाना असल्याची बाब उघडकीस झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील एका लिपिक कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. नियमाचा भंग केल्यामुळे लिपिकाला सक्त ताकीद देत एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
साखरे हे पालिका आस्थापनेवर लिपिक आहेत. मात्र, पुणे महापालिकेच्या विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत त्यांच्या नावे व्यवसाय परवाना असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची चौकशी केली असता, यामध्ये तथ्य आढळले. साखरे यांना नोटीस बजाविल्यानंतर त्यांनी
खुलासा केला. यामध्ये त्यांनी चप्पल विक्रीचा आमचा वंश परंपरागत व्यवसाय असून, चप्पल विक्रीचा स्टॉल आहे.
मात्र, वडील अशिक्षित असल्याने दंडाच्या पावत्या व २०१४ साली व्यवसाय परवाना माझ्या नावे निर्गत झाला आहे. २०१५ साली त्यांनी कौटुंबिक करारनामा करत परवाना त्यांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्यांच्या वहिनीच्या नावे हस्तांतरित केला असल्याचे खुलाशात नमूद केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा तसेच राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ मधील तरतुदींचा भंग केल्यामुळे एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश देत, भविष्यात त्यांच्याकडून असे गैरवर्तन घडल्यास यापेक्षा कठोर कारवाईची ताकीद आयुक्तांनी दिली आहे.