पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा समजली जाणारी पीएमपी रोज सुसाट धावत असते. दिवसेंदिवस पीएमपीच्या प्रवाशांच्या संख्येत आणि उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. अशातच पीएमपीचे वाहक आणि चालक अक्षरश: देवदूतासारखे प्रवाशाच्या मदतीसाठी धावून आले. त्यामुळे पीएमपी चालक आणि वाहकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भेकराईनगर ते आळंदी या बसमध्ये एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी पीएमपी चालकाने बसलाच रुग्णवाहिका केली. तसेच पीएमपीच्या वाहकाने प्रवाशाला प्रथमोपचार करत रुग्णालयात तपासणीसाठी पोहोचवले. त्यामुळे पीएमपी चालक आणि वाहक यांच्यामुळे त्या प्रवाशाला उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.
पीएमपी चालक आणि वाहकाची नावे बालाजी गायकवाड आणि सुनील करंडे असे आहे. हे दोघेही फुरसुंगीतील भेकराईनगर येथील पीएमपी आगारात इलेक्ट्रिक बसवरील चालक आणि वाहक म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रोजच्या प्रमाणे चालक आणि वाहक रात्री भेकराईनगर ते आळंदी या मार्गावरील बसवर कर्तव्यावर होते. त्यावेळी बस आळंदीकडे मार्गस्थ झाली. भैरोबानाला येथे बस आल्यानंतर एका प्रवाशाच्या छातीत जास्त दुखू लागले. वाहक सुनील यांनी ही बाब चालकास सांगितली. यावेळी चालकाने बस थांबवून प्रवाशाची अवस्था पाहिली, त्या प्रवाशाला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते.
त्यादरम्यान, जवळपास रुग्णवाहिका बोलावण्याइतपत वेळ नसल्याने दोघांनीही त्वरित निर्णय घेतला. आणि प्रवाशास ससून रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यास सांगितले. यावेळी योग्य वेळी निर्णय घेतल्याने प्रवाशाचे प्राण वाचले. बालाजी आणि सुनील या वाहन आणि चालकाने प्रसंगवधान पाहून घेतलेल्या निर्णयाने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.