मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात सध्या तरी स्थान देण्यात आले नसल्याने कार्यकत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. वळसे पाटील यांनी यापूर्वी ऊर्जा, उच्च तंत्र शिक्षण त्याचबरोबर उत्पादन शुल्क, सहकार आणि गृहमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. यंदा मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.
आंबेगाव तालुक्याचे आमदार म्हणून सलग आठ वेळा विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याचे दिसून आले नाही. गेली २५ वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून विविध खात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वळसे पाटलांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाचे स्थान न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेले ३५ वर्ष आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार दिलीप वळसे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या आंबेगांव विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी सोहळ्या दरम्यान सांगितले की, मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही. काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे. आता ५ वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे वळसे पाटील यांना पुढील टर्मला संधी मिळेल की, आणखी कोणते विशेष पद मिळणार याकडे जनतेचे लक्ष आहे.