पिंपरी : वाकड येथील बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने एकच खळबळ उडाली होती. अर्धवट झुकलेल्या स्थितीत असलेली ही इमारत कधीही खाली कोसळू शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. ही वाकलेली इमारत अखेर महापालिकेने पाडली आहे. धोकादायक काम केल्यामुळे विकसकाला नोटीस दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पाडण्याचा खर्च देखील वसूल केला जाणार आहे.
वाकड पोलीस ठाण्यासमोर बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही इमारत एका बाजूला कलली. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, राहुल सरोदे यांनी थेरगाव उप अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती दिली. त्यानुसार पिंपरी आणि थेरगाव येथील अग्निशमन बचाव पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले. वाकलेली इमारत पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
इमारतीच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अग्निशमन जवानांनी पोलिसांच्या मदतीने इमारतीच्या आजूबाजूचा परिसर खाली केला. इमारतीला पोकलेनचा आधार दिला. अखेरीस सकाळी इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
तीन मजली असलेली ही इमारत वाय पद्धतीने उभारण्यात आली होती. दोन पिलरवर उभारलेली इमारत असल्यानेच ती झुकल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इमारत कलल्यानंतर पोकलेनच्या साहाय्याने इमारतीला सपोर्ट देण्यात आला होता.