Parth Pawar Land Scam : कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीच्या संशयास्पद व्यवहाराने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र (Parth Pawar) पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या मालकीच्या ‘अमेडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा उल्लेख समोर आल्याने प्रकरणाला अधिक गंभीर वळण लागले आहे. सरकारी मालकीची जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्यात आल्याचा आरोप मुख्य संशयित शीतल तेजवानीवर करण्यात आला आहे.

या घोटाळ्याबाबत शीतल तेजवानी, ‘अमेडिया’ कंपनीचा भागीदार दिग्विजय पाटील आणि सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र पोलिसांना मुख्य आरोपी शीतल तेजवानीचा ठावठिकाणा सापडलेला नाही. तिचा मोबाईल फोन बंद असून ती आपल्या पती सागर सूर्यवंशीसह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या राहत्या पत्त्यावर पोलिसांनी छापा मारला असता दोघेही अनुपस्थित होते.
शीतल तेजवानीचा गुन्हेगारी इतिहास आधीपासूनच चर्चेत आहे. तिने यापूर्वी ‘सेवा विकास बँके’शी संबंधित तब्बल 41 कोटी रुपयांच्या फसवणुकीत सहभाग घेतल्याचे समोर आले होते. या प्रकरणात शीतल आणि तिच्या पतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे दहा वेगवेगळी कर्जे घेतली होती. या घोटाळ्याच्या तपासादरम्यान ईडीने त्यांच्यावर कारवाई करत सुमारे 45 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
सागर सूर्यवंशीला या प्रकरणात सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलिस आणि ईडीकडून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळाल्याने ती पोलिसांच्या हाती लागली नाही.
आता कोरेगाव पार्क जमीन घोटाळा आणि बँक फसवणूक या दोन्ही प्रकरणांत शीतल तेजवानी प्रमुख आरोपी ठरली आहे. त्यामुळे तिनेही निलेश घायवळप्रमाणे पोलिसांना चकवले का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली असून ती कुठे लपली आहे याबाबत तपास वेगाने सुरू आहे.







