मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या एका भेटीमुळे वाद निर्माण झाला आहे. पार्थ पवारांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सध्या तुफान व्हायरल झाले आहेत. अखेर आज या भेटीवर अजित पवारांनी मौन सोडले आहे.
अजित पवार म्हणाले, पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे याची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचे झाले आहे. पार्थ ज्या घरी गेला होता त्याठिकाणी गजा मारणे आला होता. माझ्या सोबत देखील असाच प्रकार घडला होता, मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलीसांना आधीच सांगून ठेवतो. असही अजित पवार म्हणाले.
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत. सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमधे होते. यावेळी त्यांनी जयश्री मारणेंच्या घरी भेट दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी भेट झाली कशी ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि गजा मारणे यांच्या घरी सदिच्छा भेट झाली. पार्थ पवार हे विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. यावेळी त्यांची भेट झाली. निवडणुका जवळ आल्याने अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार पुणे विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी पार्थ पवारांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्याचवेळी त्यांनी मारेणेंच्या घरी भेट दिली . त्यावेळी गजानन मारणे आणि पत्नी जयश्री मारणेंनी पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचं स्वागतही केलं. हाच स्वागत समारंभ आता चांगलाच रंगात आला आहे.