पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. २६ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक पुणे शहरात येण्याची शक्यता असल्याने शहरातील विविध ठिकाणच्या जागा वाहनतळांच्या विशेष जागा निश्चित करून नियोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ६५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पुणे शहरातील नदीपात्र भिडे पूल, पाटील प्लाझा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, हरजीवन हॉस्पिटल- सावरकर चौक, पीएमपीएल मैदान पूरम चौक, निलायम टॉकीज, विमलाताई गरवारे शाळा, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कटारिया माध्यमिक शाळा, मिनर्व्हा पार्किंग मंडई व हमालवाडा पार्किंग या ठिकाणच्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
हवाई उड्डाणांना मज्जाव :
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मज्जाव करण्यात आला आहे.