लोणी काळभोर, : ज्ञानाच्या क्षेत्रात भारत महासत्ता बनवण्याचे स्वप्न या शैक्षणिक धोरणातून साकारले जाणार असल्याने बदलत्या शैक्षणिक धोरणाकडे विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही सकारात्मक दृष्टीने पहावे, असे मत प्रा. डॉ. भाऊसाहेब दरेकर यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. भाऊसाहेब दरेकर बोलत होते.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास मंजुळकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाचे संपूर्ण देशभर स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण कलागुणांना विकसित करण्याचे सामर्थ्य या शैक्षणिक धोरणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डोळस वृत्तीने ज्ञानार्जन करून आपले भविष्य उज्वल करावे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. परमजीत खनुजा यांनी केले. प्रा. डॉ. स्नेहा बुरगूल यांनी सूत्रसंचालन तर उपस्थितांचे आभार प्रा. सतीश कुदळे यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.