पुणे : पुण्यात चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरून चोरट्यांनी शस्त्राच्या धाकाने चंदनाचे झाड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (१० ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय प्रभात रस्ता परिसरातील भारती निवास काॅलनीत राहण्यास आहेत. शनिवारी मध्यरात्री चंदन चोरटे बंगल्यात शिरले. गाढ झोपेत असलेल्या महिला आणि तिच्या कुटुंबीयांना बंगल्यात अज्ञात व्यक्ती शिरल्याचे लक्षात आले. चोरट्यांचा आवाज त्यांनी ऐकला.
महिला बंगल्याच्या आवारात आली. त्यावेळी सात ते आठ चोरटे आवारातील चंदनाचे झाड करवतीने कापत असल्याचे निदर्शनास आले. महिलेने आरडाओरडा केला असता चोरट्यांनी महिला आणि तिच्या कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.
चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.