पुणे : सार्वजनिक ठिकाणे, हॉस्पिटल, रेल्वे स्थानके याठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा फोन पोलीस कंट्रोल रूमला करून, सर्वांचीच झोप उडविण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. नुकताच नवी पेठेतील पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला आणि सर्वांचीच भितीने गाळण उडाली. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी तत्काळ रुग्णालयाची पाहणी केली. मात्र, तपासणीमध्ये कोणतीही बॉम्बसदृश वस्तू आढळली नाही.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी पोलीस नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आला. या घटनेची माहिती विश्रामबाग पोलीस, तसेच बॉम्ब शोधक पथकाला देण्यात आली. बॉम्बच्या अफवेमुळे परिसरात घबराट उडली.
दरम्यान, बॉम्ब शोधक पथकाने तत्काळ परिसराची कसून तपासणी केली. संशयास्पद वस्तूंची तपासणी केली. मध्यरात्रीपर्यंत तपासणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही प्रकारची बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. यामुळे कोणीतरी समाजकंटकाने खोडसाळपणे पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.