संतोष पवार
पळसदेव : पुणे-सोलापूर महामार्गावर वसलेले पुर्नवसित पळसदेव हे मोठी बाजारपेठ असणारे गाव आहे. पळसदेव आणि पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी नोकरवर्ग, व्यावसायिक व उद्योजक यांच्याकडुन बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दोनच दिवसांपूर्वी गणरायांचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. विविध तरुण -सार्वजनिक मंडळांनी मोठ्या उत्साहात श्रींची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आता बाप्पाच्या आगमनापाठोपाठ गौराईच्या आगमनाचे वेध लागले आहेत.
घरोघरी गौराईचे आगमन होणार असल्याने पळसदेव व परिसरात सर्वत्र चैतन्याचे व आनंददायी वातावरण आहे. बाजारपेठा गौरी सजावटीच्या वस्तूंनी भरभरून गेलेल्या आहेत. सध्या प्लास्टिक फुले व हार, तोरणे याची चलती बाजारात दिसून येत आहे. गौराईची पावले, मुखवटे रांगोळी, वेगवेगळे स्टिकर्स यांना मागणी आहे. गौरी आणण्याचा मुहूर्त मंगळवार (ता.10) रोजी रात्री 8.02 पर्यंत असल्याने त्याची तयारी आजपासूनच सुरू झाली आहे.
त्यामुळे बाजारपेठेत महिलावर्गाची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, हार, तोरणे विविध डेकोरेशनचे साहित्य लाईटच्या आकर्षक माळा यांनी बाजारपेठ फुलुन आली आहे. पावसाच्या फटक्यामुळे सध्या हार -फुलांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने आकर्षक दिसणाऱ्या रेडिमेड प्लॅस्टिकची आकर्षक रंगीबेरंगी फुले ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. गौरी – गणपतीच्या सणांमुळे सर्वत्र उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.