पुणे: पुणे (Pune News) शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये पाकिस्तानी गायकाचा (Pakistani Singer) कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास बॉलर्स पब (Bowlers Pub) बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

निषेध आणि घोषणाबाजी
पबमध्ये खासगी कार्यक्रमासाठी पाकिस्तानी गायकाला आमंत्रित केल्याची चर्चा पसरल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. “भारतावर हल्ले करणाऱ्या देशातील कलाकारांना येथे बोलावणे देशद्रोहासमान आहे,” असा आरोप त्यांनी केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवले. दरम्यान, आशिया कप करंडक स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात रविवारी लढत होती. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदात पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना होत असल्याने त्याची जोरदार चर्चा होती. अशात पाकिस्तानी गायकाला पुण्यात कार्यक्रमासाठी बोलावल्याने हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिक चांगलेच संतापले होते.
पोलिसांची भूमिका
या घटनेनंतर पोलिसांनी आयोजकांकडून कार्यक्रमाच्या परवानगीबद्दल आणि पाकिस्तानी गायकाच्या सहभागाबद्दल चौकशी सुरू केली आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुढील आंदोलनाचा इशारा
या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पुढील काळात अशा प्रकारे पाकिस्तानी कलाकारांना बोलावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील संवेदनशील भागात असे प्रकार कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.







