लोणी काळभोर, (पुणे) : बहुचर्चित अर्धवेळ (अतिरिक्त) तलाठी पद्मिनी मोरे यांची लोणी काळभोरच्या तलाठीपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. तेथील अतिरिक्त कार्यभार नायगावचे तलाठी महादेव भारती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पद्मिनी मोरे यांच्याबाबत गंभीर तक्रारी असून त्यांच्या लक्ष मोलाच्या प्रोटोकॉलचा प्रत्यय वरिष्ठ कार्यालयातील अधिका-यांना आल्याने त्यांना लोणी काळभोरमधून तातडीने हटवल्याची माहिती समोर आली आहे.
वाहन चालकांकडून लोणी काळभोर तलाठी कार्यालय चालवणे, संबंधित चालकांकडून डीएससीचा वापर करुन अभिलेख हाताळणे, ई म्युटेशनचे फेरफार उशिरा घेणे, नोटीस उशीरा भरणे, खातेदारांना वेठीस धरणे या विविध कारनाम्यांचा ‘पंचनामा’ पुणे प्राईम न्यूज ने वेळोवेळी जनतेसमोर व प्रशासनापुढे मांडला होता.
लोणी काळभोर तलाठी सजा महसूली दृष्ट्या नामांकित समजला जातो. पण पुर्णवेळ तलाठी नसल्याने येथील अर्धवेळ कार्यभार पद्मिनी मोरे यांच्याकडे होता. त्यांच्याकडे न्हावी सांडस तलाठी कार्यालयाचा मूळ पदभार आहे. त्याठिकाणाहून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी काळभोरचा अर्धवेळ चार्ज त्याना प्रशासनाने दिलेला होता.
लोणी काळभोरमधील कदमवाकवस्ती येथेही स्वंतत्र तलाठी नियुक्त झालेला आहे. तसेच लोणी काळभोर मधील सिद्राम मळा येथील सजाला नवीन तलाठी मिळालेले आहेत. मात्र, लोणी काळभोर या मोठ्या तलाठी कार्यालयाला अद्याप पूर्णवेळ तलाठी मिळालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून अनेक रिक्त व नवीन तलाठी कार्यालयासाठी तलाठ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, लोणी काळभोर तलाठी कार्यालय पूर्णवेळ तलाठी पदाला अपवाद ठरले आहे.
लोणी काळभोर तलाठीपदाचा अतिरिक्त कार्यभार पद्मिनी मोरे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. तेथील अतिरिक्त पदभार महादेव भारती यांच्याकडे देण्यात आला आहे. भारती यांनी तातडीने पदभार स्विकारुन कामकाज करणेबाबतचे आदेश देण्यात आले आहे.
तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार, अपर तहसील कार्यालय – लोणी काळभोर