Pachgani News : पाचगणी : पर्यटनस्थळ म्हणून सुप्रसिद्ध असलेले आंब्रळ येथील टेबल लॅंड विकसित करण्याचा ध्यास आंब्रळच्या सरपंच माधुरी गुलाबराव आंब्राळे यांनी घेतला आहे. पर्यटन विकासासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना प्रस्ताव सादर केला असून, ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंचांनी वनतळ्याचे जलपूजन केले.
वनतळ्याचे जलपूजन
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी टेबल लॅंडप्रमाणे आंब्रळ गावालाही नैसर्गिक असे ८३ एकराचे टेबल लॅंड पठार लाभले आहे. येथून महू धरण जलाशयाचे दर्शन, सभोवतालचे डोंगर, दऱ्या-खोऱ्या नजरेस पडतात. वैराटगड, पांडवगड देखील येथून दिसतात. तर येथून जावळी व वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतीचा निसर्गरम्य परिसर दिसून येतो. या नैसर्गिक पठारावर एक हेक्टरच्या परिसरात विस्तीर्ण असे नैसर्गिक वनतळे आहे. हे वनतळे तुडुंब भरल्याने त्याचे जलपूजन सरपंच आंब्राळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सरिता आंब्राळे, सारिका आंबाळे, भानुदास बिरामणे, विकास जंगम, ग्रामस्थ माधुरी जंगम, वर्षा आंबाळे, मारुती आंब्राळे, विठ्ठल आंबाळे, गुलाब आंत्राळे, सुहास आंबाळे, लक्ष्मण आंब्राळे आदी उपस्थित होते. Pachgani News
या वेळी बोलताना सरपंच आंब्राळे म्हणाल्या की, पाचगणी-महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीण भागातील आहार पद्धती येथील सामाजिक, सांस्कृतिक जडणघडण व पारंपारिक लोककला अनुभवयास मिळेल. पाचगणीच्या टेबल लॅंडप्रमाणेच आंब्राळ येथील टेबल लॅंडवर पर्यटकांना अनुभवास येईल व पर्यटकांची पावले या पर्यटनस्थळी आकर्षित होतील. या ठिकाणी पर्यटकांची ये-जा सुरू झाल्यास ग्रामीण युवकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळू शकेल. गावचा आर्थिक विकास होईल. त्याचबरोबर येथील युवकांना उत्पन्नाचा आर्थिक स्तोत्र निर्माण होईल. आंब्रळ गावच्या टेबल लॅंड पठाराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाला तर महाबळेश्वर तालुक्यात पाचगणीप्रमाणे आंब्रळ येथे नवीन पर्यटनस्थळाची निर्मिती होऊन परिसराचा नक्कीच कायापालट होईल. Pachgani News