योगेश पडवळ
Pabal News : पाबळ (पुणे) : “आपल्या भारतीय लोकशाहीत सर्वांना मतदानाचा समान अधिकार दिला असून तो अधिकार पूर्ण सुज्ञपणे बजावला पाहिजे. आपल्याला हा अधिकार आपल्या संविधानाने दिला आहे. भारताचे संविधान हे जगात सर्वात लवचिक संविधान असून त्यात बदलही करता येतो, प्रसंगी ते कठोर ही आहे. तेव्हा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा चांगला वापर करून आपण देशात खूप मोठा बदल करू शकतो”. असे मत नायब तहसिलदार सचीन वाघ यांनी केले.
नोंदणी अभियानाचे आयोजन
पारगाव (ता. आबेगाव) येथील भिमाशंकर शिक्षण संस्था संचलित दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
विशेष कार्यकारी अधिकारी बी. डी. चव्हाण म्हणाले, ” “आपण सुशिक्षित मतदार आहोत. आपण चिंतन केले पाहिजे पण आपली अडचण अशी आहे की, आपण चिंतनापेक्षा चर्चा जास्त करतो आणि तेच चुकते. चर्चा करा पण चांगली करा. त्यात सखोल ज्ञान महत्त्वाचे आहे. विचार मंथन होणारी चर्चा ही सर्वांनाच यशस्वी बनवते. त्यातून यशाकडे जाणारा मार्ग सापडतो”.
यावेळी प्राचार्य डॉ. शत्रुघ्न थोरात, कार्यालयीन सचिव वसंत जाधव, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी राहुल डोळस, संजीवनी टाके, कला विभाग प्रमुख राहुल पडवळ, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शौकतअली इनामदार, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख, डॉ. विक्रम ओतारी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व विद्यार्थी, सर्व प्राध्यापक तर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रियंका वायाळ यांनी केले. राहुल डोळस यांनी आभार मानले.