पुणे : पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्था हे की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात सराईत गुन्हेगाराने भर रस्त्यात एका आयटी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
स्वारगेट परिसरात ही घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तर आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कृष्णा बाबूराव सावंत (वय 25, रा. वांजरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची कोल्हापूरची आहे. सध्या ती कोंढवा परिसरात राहत असून ती आपल्या मैत्रिणीसह लष्कर भागात खरेदीसाठी गेली होती. याचवेळी स्वारगेट परिसरात बस थांब्याजवळ पिडित तरूणी थांबलेली असताना आरोपीने तरुणीची छेड (Pune Crime) काढली. तरूणीने आरोपीला विरोध केल्यानंतर त्याने तरुणीला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
आरोपीवर यापुर्वी गुन्हे दाखल..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबूराव सावंत याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच मारामारी केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच आरोपी जामिनावर बाहेर आला आहे.