पुणे : पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चुलत्यानेच आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. नराधम चुलता एवढ्यावरच न थांबता, अनैतिक संबंधातून पुतणी गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला. या प्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा खळबळजनक प्रकार नोव्हेंबर २०२३ ते आजपर्यंत पीडित मुलीच्या लोहगाव येथील घरात घडला.
याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओंकार प्रमोद कदम (वय-२८, रा. पेढांबे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याच्यावर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा चुलत दिर आहे. आरोपीने फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्याशी गोड बोलून, तिचा विश्वास संपादन केला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
दरम्यान, काही काळानंतर हा प्रकार घरच्यांना समजला. घरच्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दोघांमधील नात्याची जाणीव करून दिली. मात्र, त्यानंतर देखील त्याने मुलीसोबत संपर्क ठेवला. मुलीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. ही बातमी समजल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.