दौंड(पुणे): तालुक्यातील कारखाने चालू होण्याच्या सुमारास शेतातील ऊस कारखान्याला लवकर तोडून देण्यासाठी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची नुसती धावपळ सुरू होती. त्यावेळी कारखाना प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये संघर्षाचे चित्र दिसून आले होते. निवडणुका संपल्यानंतर कारखाने सुरू झाले त्यावेळी तालुक्यातील कारखान्यांनी ऊसाला हप्ता पोटी पहिली उचल 2800 रुपये प्रमाणे भाव जाहीर केला त्यामुळे गुऱ्हाळ चालकांचे धाबे दणाणले. आता मात्र गुऱ्हाळ चालकांनी ऊसासाठी प्रती टन 3300 ते 3400 रुपये प्रमाणे ऊस तोडणी सुरू केली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊसतोडीसाठी कारखाना अन् गुऱ्हाळ यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
तालुक्यांत दौंड शुगर, श्रीनाथ म्हसोबा, तसेच भिमा पाट्स असे तीन कारखाने जोमात सुरू असल्याने उसाचे प्रमाण घटले आहे. यामुळे गुऱ्हाळ बंद पडण्याच्या मार्गावर होती. सर्वाधिक गुऱ्हाळची संख्या असलेला दौंड तालुका कृषी अर्थकारणाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित आहे. तालुक्यात जवळपास 400 ते 450 गुऱ्हाळ असल्याने हा दौंडचा पॅटर्न जिल्ह्यासह महाराष्ट्रात देखील परिचित आहे. आत्ता हाच पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे.
आता गुऱ्हाळ चालकांनी ऊसासाठी प्रती टन 3300 ते 3400 रुपये प्रमाणे ऊस तोडणी सुरू केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कारखाना साठी ऊस न देता गुऱ्हाळ साठी तोडताना दिसत आहे. त्यातच तालुक्यांतील साखर कारखाने बाजार भाव देण्यासाठी स्पर्धा करत आहेत. परंतु अलीकडील काळात खाजगी तसेच सहकारी साखर कारखाने, गुऱ्हाळ मालक, परराज्यातील रसवंती गृहाकडून उसाची वाढलेली मागणी ऊस दरवढीसाठी पोषक ठरत आहे.
आगामी काळात यामध्ये देखील वाढ होऊ शकते म्हणून गुऱ्हाळ मालक ऊस तोडणीसाठी ईसार देऊन बुकिंग करत आहेत. यामुळे गाळपासाठी आवश्यक असलेला ऊस पळविण्यात येऊ लागल्यामुळे कारखान्यांचा ऊस कमी पडायला लागला आहे. यामुळे दौंड तालुक्यातील सर्वच ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार, गुऱ्हाळ मालक, रसवंती गृह मालक यांच्यात ऊस तोडणीसाठी मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.